पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या ( drink and drive ) अल्पवयीन मुलाने दोन इंजिनिअरना चिरडलं. या अपघातात दोन्ही इंजिनिअरचा मृत्यू झाला. पुण्यातल्या या हिट ऍण्ड रन (hit and run case) प्रकरणी रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. यातच आता अल्पवयीन मुलाने जी गाडी चालवली त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन मुलाने जी पॉर्श गाडी चालवली ती बंगळुरूहून पुण्यात आणण्यात आली होती. टॅक्स न भरल्यामुळे आरटीओने या गाडीची नोंदणी केली नव्हती, तरीही गाडी रस्त्यावर फिरत होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही वस्तूस्थिती असल्याचं मान्य केलं आहे, तसंच याप्रकरणीही कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले आहेत.
अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुण्यातल्या कोझी बारवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा बार सिल केला आहे. रविवारी हा अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केलं गेलं, पण तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला लगेचच जामीन देण्यात आला.
या अल्पवयीन आरोपीने तपासामध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. वडिलांनी मला पार्टीसाठी परवानगी दिली, तसंच कार चालवण्याचं रितसर प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही वडिलांनी मला कार चालवायला परवानगी दिली, असं या मुलाने पोलीस तपासात सांगितलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक केली आहे.
पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलानं पोर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. यामध्ये इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
‘हा गुन्हा गंभीर असल्यामुळे अल्पवयीन आरोपीला प्रौढ म्हणून ट्रिट करा, असं स्पष्ट म्हटलं होतं, पण ज्युवेनाईल कोर्टाने सीन ऍण्ड फाईल शेरा मारला. कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे. याच ऑर्डरविरोधात पुणे पोलीस वरच्या कोर्टात गेले होते, पण त्यांनी पुन्हा ज्युवेनाईल बोर्डालाच रिव्ह्यू घ्यायला सांगितलं. पुणे पोलीस या केसमध्ये शेवटपर्यंत लढत राहतील’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.