शिर्डी Shirdi BJP Adhiveshan : विधानसभा निवडणुकीत मविआला पराभवाची धूळ चारत महायुतीने सत्तेत दमदारपणे पुनरागमन केले. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकल्या. या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत राज्य भाजपचे अधिवेशन पार पडले. शिर्डीतील अधिवेशनाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान हल्ला केला.
पवार-ठाकरेंवर शाहांचा हल्लाबोल…
शिर्डी मधील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. शरद पवार यांनी कायमच दगाफटक्याचे राजकारण केले. त्यांचे राजकारण 20 फूट जमिनीत गाडण्याचे काम राज्यातील जनतेने केले तसेच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेने जागा दाखवली, अशा शब्दात अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली. शाह यांनी म्हटले की, शरद पवार यांनी 1978 मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली 20 फूट गाडून टाकले असल्याची बोचरी टीका अमित शाह यांनी केली.
विधानसभा प्रचार ठाकरे-पवारांवर एकही टीका नाही
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी अमित शाह यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. लोकसा निवडणुकीत पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र, विधानसभेत भाजपच्या या नेत्यांनी ठाकरे-पवारांवर टीकाच नव्हे तर थेट नाव घेणं देखील टाळलं. त्याच्या परिणामी ठाकरे-पवारांबाबत सहानुभूतीदेखील निर्माण झाली त्याऐवजी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आणलेला हिंदुत्वाचा अजेंडा, वोट जिहाद सारखे अधिक चर्चेत आले. याचा फायदा भाजप-महायुतीला झाला.
विरोधी पक्षमुक्त महाराष्ट्राची हाक
शिर्डीत भाषण करताना अमित शाह यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्ष मुक्त महाराष्ट्र करण्याचे संकेत दिले. अमित शाह यांनी भाषणात विधानसभेच्या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. विकासाचे वर्तुळ तेव्हाच पूर्ण होते जेव्हा पंचायत ते संसद एकाच पक्षाचे सरकार असते. आता विधानसभेत आणि संसदेत भाजप आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून आले पाहिजेत. विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असली पाहिजे, असे अमित शाह यांनी म्हटले.