शिर्डी | साईबाबांच्या चरणी 2025 या चालू वर्षात सर्वात मोठं सुवर्ण दान आलयं. ( gold crown donation to shirdi saibaba) साईंना एक अतिशय मौल्यवान आणि भक्तिभावाने ओतप्रोत अशी देणगी अर्पण करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका निनावी साईभक्ताने (sai devotee) तब्बल 788 ग्रॅम वजनाचा, सुमारे 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकूट साईबाबांना अर्पण केला आहे.
कसा आहे 68 लाखांचा सुवर्ण मुकुट
हा सुवर्ण मुकूट 2025 मधील सर्वाधिक मौल्यवान दान म्हणून ओळखला जात आहे. या मुकूटावर अत्यंत नाजूक व सुंदर नक्षीकाम करण्यात आलं असून त्यामध्ये डायमंडने कोरलेलं ‘ॐ’ हे चिन्ह विशेष लक्ष वेधून घेतं. साईंच्या चरणी अशी कलाकुसर युक्त आणि महागडी वस्तू दान देणं हे भक्तीचं आणि श्रद्धेचं एक अप्रतिम उदाहरण ठरतं.
आज दुपारी मध्यान्ह आरतीनंतर (sai baba aarti) या मुकुट साईबाबांना अर्पण करण्यात आला आहे. शिर्डीतील साई मंदिरात उपस्थित हजारो भाविकांच्या साक्षीने हा मुकूट साईंच्या मूर्तीवर चढवण्यात आला. दरम्यान भाविकांनी “साईराम” चा गजर करत हा सोहळा अत्यंत उत्साह पार पडला.
दानशूर भाविकांचे नाव गुप्त
महत्त्वाचं म्हणजे या मुकूटाचे दान करणाऱ्या भक्ताने आपलं नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “साई बाबांना एका हाताने दिलं तर बाबा हजारो हातांनी भरभरुन परत करतात,” या श्रद्धेने प्रेरित होऊन त्यांनी ही देणगी दिली आहे. साईबाबांवर असलेल्या अपार श्रद्धेच्या आणि भक्तिभावातून साईंना नेहमीच अस सुवर्ण दान येत असतं.
शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाने (sai baba trust shirdi) देखील या अर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. साईसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दनाशूर भाविकांचा यथोचित सत्कार करत अभार मानले.
का करतात साईंना दान?
साई मंदिरात दररोज हजारो भाविक साईंच्या दर्शनासाठी येत असतात. काहीजण आपल्या समस्या, आजार, संकटं घेऊन बाबांच्या चरणी येतात तर काहीजण आपल्या यशस्वी जीवनप्रवासासाठी आभार मानण्यासाठी. अनेक भाविक साईबाबांच्या कृपेने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचं सांगतात. त्यामुळे साई चरणी सोनं, चांदी, रोख रक्कम यासारख्या मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात.
साईबाबांच्या शिकवणुकीनुसार, “श्रद्धा आणि सबुरी” हीच खरी भक्तीची ओळख आहे. आणि आजच्या या देणगीच्या प्रसंगाने हेच सिद्ध केलं आहे की, सच्च्या श्रद्धेने अर्पण केलेली कोणतीही गोष्ट साईंच्या चरणी स्वीकारली जाते, मग ती लहान असो किंवा लाखोंची.