महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सुरक्षा उपाययोजना, नवीन वाळू धोरण, तसेच राजकीय घडामोडींवरील आपली भूमिका स्पष्ट केली.
काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर दहशतवाद्यांकडून रेकी झाल्याच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सावधगिरी बाळगली जात आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, फडणवीस सरकारने राज्यातील पर्यटनस्थळे व यात्रा स्थळांवर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना अलर्ट केले आहे. “राज्यातील १४ कोटी जनतेचे संरक्षण हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
१५ मेपासून नवीन वाळू धोरण लागू
राज्यात १५ मेपासून नवीन वाळू धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. शिवाय, राज्यभरात दगडांपासून कृत्रिम वाळू (मॅन्युफॅक्चर्ड सँड) निर्मिती करणारे क्रेशर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. बावनकुळे म्हणाले, “पुढील तीन वर्षांत नदीतील वाळूवरील अवलंब टळणार असून पर्यावरण संरक्षणाला मोठा हातभार लागेल. सरकारी कामांसाठीदेखील यापुढे नैसर्गिक वाळूऐवजी एम्स वाळू वापरण्यावर भर दिला जाईल.”
राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांबाबत बावनकुळे म्हणाले, “ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आम्हाला काहीच फरक पडत नाही. याचा भाजपला ना फायदा ना तोटा. कारण सध्या कोणतीही निवडणूक नाही; पुढील निवडणुका २०२९ मध्ये होणार आहेत.”
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत कडक भूमिका
बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अधिकृतरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच जे बेकायदेशीर किंवा विनापरवाना महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवली जात आहे. “ही प्रक्रिया सुरूच आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिकृतपणे राहणाऱ्यांनाही हद्दपार करण्याचे काम गतीने सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.