राहुरी, जि. अहमदनगर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राहुरी तालुक्यातील टाकळी मियॉ येथे झालेल्या नागरी सत्कार समारंभात महायुती सरकारवर आणि मंत्र्यांवर संतप्त हल्ला चढवत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मंत्र्यांना वेळ आली तर तुडवा, हाणून विचारलं पाहिजे – सातबारा कोरा कधी करणार?” अशा थेट शब्दांत खडसावलंय.
भावनिक फसवणूक आणि खोटं आश्वासन
राजू शेट्टी म्हणाले की, “महायुतीने विधानसभा निवडणुकीत ‘सातबारा कोरा करू’ असं अश्वासन दिलं. त्यावेळी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना भावनिक केलं, आणि त्यांची मते घेतली. आता सत्तेत आल्यावर तेच मंत्री राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचं सांगून हात वर करत आहेत. हा साफ विश्वासघात आहे!”
“मंत्र्यांना थेट विचारायला !”
ते पुढे म्हणाले की, “जसं अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि म्हाडा कार्यालयात मंत्री शंभूराजे देसाईंना थेट शेतकऱ्यांनी जाब विचारला, तसंच आता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात, प्रत्येक तालुक्यातील मंत्र्यांना अडवा. त्यांना विचारा, आमची मते घेतलीत, आता आमचं कर्ज माफ कधी करणार?”
अजित पवारांवर थेट आरोप
राजू शेट्टींनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “हा जाहीरनामा तिन्ही पक्षांचा होता आणि अर्थमंत्री अजित पवार होते. त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याची परिस्थिती त्यांना माहीत नव्हती का? तरीही आश्वासन दिलं. सरकार कोणतही असो अर्थमंत्री हेच.. अजितदादा.. असून म्हणून खोचक टिका देखिल केली.
परभणीतील आत्महत्या आणि सरकारचा खर्च
परभणी जिल्ह्यातील माळसोना गावात शेतकरी सचिन जाधव यांनी केवळ दीड लाख रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. त्याच रात्री त्यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीनेही आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेचा उल्लेख करत शेट्टींनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर ताशेरे ओढले.
तत्पूर्वी सरकारने अहिल्यानगर (चौंडी) येथे होणाऱ्या एकदिवसीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तब्बल 150 कोटींचं टेंडर काढलं, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
हेलिपॅडवर कोटी, पण शेतकऱ्यांसाठी काही नाही
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यावरून शेट्टींनी सरकारला आणखी घेरलं. “रायगडपासून सुतारवाडीपर्यंत जाण्यासाठी दीड कोटी रुपये खर्चून हैलिपॅड तयार केला जातो. त्यासाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत. या सरकार कडे अशा कामांसाठी निधी आहे मात्र शेतक-यांच्या कर्जमाफी साठी नाही. तेव्हा त्यांना हाणलचं पाहीजे अस देखिल राजू शेट्टी यांनी म्हटलं.