शिर्डी Shirdi Makar Sankranti : मकर संक्रांती (Makar Sankranti) निमित्तानं शिर्डी साईबाबांना तामिळनाडू राज्यातील कोईंबतूर येथील एस. वाडीवेल (s Vadivel) या साईभक्तानं तब्बल 80 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी अर्पण केली आहे. या साखळीची किंमत 5 लाख 73 हजार 430 रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे.
आज सायंकाळी साईबाबांच्या धुपाआराती दरम्यान वाडीवेल साई भक्त परिवारानं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. अतिशय सुंदर कारागिरी केलेली ही 80 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी वाडीवले परिवारानं साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडं सुपुर्द केली.
यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं वाडीवेल या साई भक्त परिवाराचा शॉल, साई मूर्ती, देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, आज मकर संक्रांती असल्यानं उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील अजय गुप्ता या साईभक्ताच्या देणगीतून साईबाबा मंदिरातील गाभारा आणि द्वारकामाई, गुरुस्थान मंदिरे तसेच साईबाबा समाधी मंदिराला बाहेरून विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.