शिर्डी: काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, संत समाजाचे मार्गदर्शक महंत रामगिरी महाराज यांनी कठोर शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला इस्लामिक आतंकवादाच्या जिहादी मानसिकतेतून झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
रामगिरी महाराज म्हणाले, “आम्ही वेगळे आहोत, काफिरांना जगण्याचा अधिकार नाही, अशा विकृत शिकवणुकीतूनच असे भयावह हल्ले घडत आहेत. जिहादी मानसिकतेच्या लोकांपासून आपण सतर्क राहायला हवे. हे लोक कधीही सुधारणार नाहीत.”
मोदी सरकारचे अभिनंदन, घुसखोरांवर कारवाईची मागणी
महंत रामगिरी महाराजांनी मोदी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत म्हटले की, “बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची सुरुवात केल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो.” त्यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की, “फक्त घुसखोरच नव्हे, तर अशा घुसखोरांना मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई व्हावी.”
‘सर्वधर्मसमभाव’चा गैरवापर टाळा – रामगिरी महाराजांचा इशारा
रामगिरी महाराजांनी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा प्रकार काही राजकीय लोकांकडून होत असल्याचा आरोप केला. “भारत हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. पण काही लोक सर्वधर्मसमभावाचा चुकीचा वापर करत आहे. एकीकडे सर्वधर्मसमभावाची गोड गोष्ट सांगायची आणि दुसरीकडे आतंकवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा, हे अतिशय धोकादायक आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
हिंदू समाजाला जागृत होण्याचे आवाहन
यावेळी रामगिरी महाराजांनी संपूर्ण हिंदू समाजाला जागृत होण्याचे आणि झोप मोडण्याचे आवाहन केले. “हिंदू समाजाने आता सावध होऊन आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी सजग राहायला हवे,” असे आवाहन त्यांनी केले.